ठाणे : ऐरोली ते काटई नाका उन्नत मार्ग प्रकल्पातील टप्पा १मधील ठाणे-बेलापूर रोड ते राष्ट्रीय महामार्ग ४ आणि टप्पा २ मधील ऐरोली ते ठाणे-बेलापूर रोडचे काम अखेर १०० टक्के पूर्ण झाले असून आता फक्त रंगरंगोटीसह सजावटीची कामे सुरू आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर भारवहन क्षमता चाचणी घेऊन हे दोन्ही टप्पे महिन्याभरात सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे.
नवी मुंबई-डोंबिवली प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी एमएमआरडीएने सुमारे १२.७१ कि.मी. लांबीचा ऐरोली-काटई नाका उन्नत मार्ग प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पामुळे ऐरोली ते डोंबिवलीदरम्यानचे प्रवासाचे अंतर अंदाजे १० कि.मी.ने आणि प्रवासाचा ३० ते ४५ मिनिटांचा कालावधी कमी होणार आहे. तीन-तीन मार्गिकांच्या या प्रकल्पाचे काम तीन टप्प्यांत हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार टप्पा १ आणि २ चे काम मागील काही वर्षांपासून सुरू होते. तर तिसऱ्या टप्प्याचे काम नुकतेच सुरू झाले आहे. दरम्यान, पहिला आणि दुसरा टप्पा याआधीच पूर्ण होऊन वाहतूक सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र, विविध कारणांनी या कामास विलंब झाला आहे. पण आता मात्र या दोन्ही टप्प्यांचे १०० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
ऐरोली ते काटई नाका उन्नत मार्ग प्रकल्पातील पहिला टप्पा ठाणे-बेलापूर रोड ते एनएच-०४ असा असून, या टप्प्याची लांबी ३.४३ किमी आहे. या टप्प्यात एक दुहेरी बोगदा असून, तो १.६९ किमी लांबीचा आहे. तर त्याची रुंदी १७.५० मीटर आहे. तर उन्नत मार्ग ०.९४ किमी लांबीचा आहे. या पहिल्या टप्प्यामुळे महापे, शिळफाटा व कल्याण फाटा येथील वाहतूक कोंडी टाळून राष्ट्रीय महामार्ग ०४ ला अखंड जोड मिळणार आहे.
ऐरोली ते ठाणे-बेलापूर रोडदरम्यानचा २.५७ किमी लांबीचा दुसरा टप्पा असून, यात तीन मार्गिकांच्या मुख्य व्हायाडक्टचा समावेश आहे. या दोन्ही टप्प्यांचे आता १०० टक्के काम पूर्ण झाले आहे. पहिला आणि दुसरा टप्पा सेवेत दाखल झाल्यास मुलुंड-ऐरोली पूल आणि मुंब्रा थेट जोडले जाणार आहेत.
६.७१ किमीच्या तिसऱ्या टप्प्याचे काम नुकतेच सुरू झाले आहे. हा टप्पा राष्ट्रीय महामार्ग ०४ ते काटई नाका (कल्याण-शिळ रोड महामार्ग) असा आहे. यात तीन-तीन मार्गिकांच्या मुख्य व्हायाडक्टसह एका सेवा रस्त्याचा समावेश आहे. हा टप्पा ऑक्टोबर २०२८ पर्यंत पूर्ण करून वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण १३.७१ कि.मी.चा महामार्ग सेवेत दाखल झाल्यास नवी मुंबई-डोंबिवली अंतर केवळ १५ मिनिटांत पार करता येणार असून, वाहतूक कोंडी दूर होणार आहे. ऐरोलीतील अंतर्गत रस्त्यांवरील, ठाणे-बेलापूर रोडवरील, महापे रोडवरील, शिळफाटा जंक्शन, कल्याण फाटा आणि कल्याण-शिळ रोड येथील वाहतूक कोंडी दूर होईल, असा दावा एमएमआरडीएकडून केला जात आहे.